नवी मुंबई / प्रतिनिधी : एका वॉर्डासाठी मर्यादित असणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाने भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, हा प्रवेश त्याने नगरसेवक बनण्याचा स्वार्थ उराशी बाळगून केला असून, त्याचा कसूभरही परिणाम काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या निवडणूक जिंकण्यावर होणार नसल्याची चर्चा रंगली आहे.
आता भाजपमय झालेला काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष ज्या वॉर्डात राहतो त्या वॉर्डात मोठ्या संख्येने गुजराती,मारवाडी आणि जैन समाज राहतो. हा समाज भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी मतदार असल्याचा त्या जिल्हाध्यक्षाचा समज झालेला आहे. तर, येथील बाहुबली लोकप्रतिनिधी आणि सक्षम नगरसेवक संपत शेवाळे हे राष्ट्रवादीत गेल्याने, याठिकाणी मंदाताईंच्या आशीर्वादाने भाजपमधून नगरसेवकाची उमेदवारी स्वतःला आणि गणेश नाईक यांच्यातर्फे जुहूगाव वॉर्डात मुलाला उमेदवारी मिळाल्यास नगरसेवकपदाची निवडणूक जिंकणे सोपे होईल. असे आराखडे त्या जिल्हाध्यक्षाने बांधून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
मात्र, या वॉर्डाच्या जिल्हाध्यक्षासोबत तो, त्याचा मुलगा आणि त्याच्याच ऑफिसमधील कर्मचारी भाजपमय झाले आहेत. आणि, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता हा पक्षासोबत असल्याचे वाशी येथील काँग्रेस भवन याठिकाणी करण्यात आलेल्या जल्लोषातून समोर आले आहे.
“विचाराने काँग्रेसी असणाऱ्या आणि स्वार्थासाठी भाजपमय झालेल्याना भाजपच्या मतदारांनी कायम नाकारले आहे.”

