पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याने महापौरपदाच्या शर्यतीत असणाऱ्यांची आता इतर ठिकाणी ऍडजेस्टमेंट करण्याची ‘बोळवण’ प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, पुरुष नगरसेवकांना पद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. अशा इच्छुक नगरसेवकांची समजूत काढण्यासाठी पक्षाकडून त्यांना स्थायी समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्य पदांवर संधी देऊन ‘बोळवण’ केली जाणार असल्याचे समजते.
भाजपने नवी मुंबई महापालिकेत पूर्ण बहुमत मिळवले असून, महापौरपदासाठी एकाहून अधिक महिला नगरसेविकांच्या नावांची चर्चा जोरात आहे. यात सर्वात ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी प्रथम महिला स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, ज्येष्ठ नगरसेविका स्वप्ना गावडे, सायली शिंदे आणि रुपाली भगत यांची नावे प्रमुखपणे पुढे येत आहेत.
दरम्यान, भाजपने महापालिकेच्या गटनेतेपदी अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांची निवड केली आहे. तर, महापौर पद महिलांसाठी आरक्षित असल्याने पुरुष इच्छुक नगरसेवकांची ‘महापौर माळ हुकली’ आहे. अशा नगरसेवकांची पक्षाकडून समजूत काढण्यासाठी त्यांना स्थायी समिती सभापती किंवा सदस्य पदाची ऑफर दिली जाणार आहे. यात दशरथ भगत, रविंद्र इथापे, सुधाकर सोनवणे, जयाजी नाथ, प्रदीप गवस, सुरज पाटील, अशोक पाटील, मिरा पाटील, दीपक पवार, रेखा म्हात्रे, गणेश सकपाळ यांसारख्या नगरसेवक-नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.
स्थायी समिती ही महापालिकेतील महत्त्वाची समिती असून, तिच्या माध्यमातून विकास कामे, अर्थकारण आणि निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकता येतो. त्यामुळे महापौरपदाच्या ‘नुकसानीची’ भरपाई म्हणून ही नेमणुकीची रणनीती अवलंबली जात असल्याचे पक्षातील सूत्र सांगतात. भाजपच्या या रणनीतीमुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
