पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी स्थानिक भूमिपुत्र महिलेला प्राधान्य मिळण्याची शक्यता वाढली आहे. शहराच्या विकासासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्या प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेलाच कॅबिनेट मंत्री गणेश नाईक महापौर बनवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नवी मुंबई हे स्थानिक आगरी-कोळी समाजाच्या जमिनीवर वसलेले असल्याने, या समाजातील महिलेला महापौर पद देण्याला विरोधी पक्षातील भूमिपुत्र नगरसेवकही अनुकूल असल्याचे समजते.
भाजपने २०२६ च्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकहाती बहुमत मिळवले असून, गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने प्रथमच स्वतंत्र बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे महापौर निवडीत नाईक यांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे. मात्र, कॉलनी भागातील महिला नगरसेविकांना महापौर पदाची संधी मिळणार नसल्याने त्यांच्यात नाईक कुटुंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या मते, कॉलनीतील नगरसेविका आणि नगरसेवकांबाबत असाच दुजाभाव कायम राहिल्यास, नाईक भाजपशी फारकत घेण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत कॉलनी भागातील नगरसेवक आपला वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला पाठिंबा देण्याची हळूहळू चर्चा सुरू झाली आहे. गेल्या १५ वर्षांनंतर शहराला महिला महापौर मिळणार असल्याने ही निवड स्थानिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरत आहे.
राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, भूमिपुत्र महिलेला महापौर बनवणे हे नवी मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या भावनांचा आदर ठेवणारे पाऊल ठरेल. मात्र, कॉलनी भागातील नाराजी वाढल्यास पक्षांतर्गत फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापौर निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, या चर्चांना अधिक तोंड फुटण्याची शक्यता आहे.

