नवी मुंबई : सीबीडी सेक्टर 8 येथील श्री शिव साई मंदिर प्रतिष्ठान ट्रस्ट वर स्थानिक नागरिकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या मंदिराच्या ट्रस्टने नवीन सदस्यांची नोंदणी सुरू करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी नागरिकांनी केली आहे, परंतु ट्रस्ट प्रशासनाकडून याबाबत सातत्याने चालढकल केली जात असल्याचा दावा केला जात आहे.
सिडकोने या मंदिराच्या उभारणीसाठी नाममात्र किंमतीत जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आहे. ते मंदिराचा वापर आपल्या राजकीय व व्यवसायिक फायद्यासाठी करत असल्याने आणि नवीन सदस्य नोंदणीला अडथळा आणत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, साईबाबा हे सर्वांना समान भावनेने सोबत घेऊन चालणारे प्रभू संत होते, ज्यात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नव्हता. परंतु या मंदिराच्या ट्रस्टिंककडून राजकीय दृष्टिकोनातून मंदिराचा वापर केला जात असल्याने भक्त आणि स्थानिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
याशिवाय, मंदिरात भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांच्या रकमेचा काही ट्रस्टी पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजकीय प्रचारासाठी दुरुपयोग केल्याचा आरोपही सातत्याने होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा आक्षेप नोंदवले आहेत.
नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, पुढील 15 दिवसांमध्ये ट्रस्टने नवीन सदस्यांची नोंदणी सुरू केली नाही तर ते न्यायालयीन मार्गाने आणि आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्यास तयार आहेत.
या प्रकरणामुळे सीबीडी सेक्टर 8 परिसरातील श्री शिव साई प्रतिष्ठान ट्रस्ट मंदिराच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक रहिवाशी ट्रस्टच्या पारदर्शकता आणि समावेशकतेची मागणी करत आहेत.

