पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीबीडी प्रभाग क्रमांक ’28’ मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार दिपाली घोलप यांचे पती पत्रकार सुदिप घोलप यांची हुंडई ऍक्सेंट कार मध्यरात्री तोडफोड करण्यात आली.
ही घटना 14 जानेवारीच्या मध्यरात्री 3 -3.30 दरम्यान घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी दगडाने दिपाली घोलप यांच्या घरात समोर उभे असणाऱ्या कारच्या पुढील आणि मागील काचा फोडल्या आणि पळ काढला.
दिपाली घोलप यांनी या घटनेचा संशय भाजपचे बेलापूर प्रभाग 27 मधील उमेदवार तेजस्वी म्हात्रे यांचे पती कुंदन म्हात्रे व सीबीडीतील भाजपच्या उमेदवारांवर संशय व्यक्त केला आहे. सुदिप घोलप हे व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी यापूर्वी अट्टल गुन्हेगार असणाऱ्या कुंदन म्हात्रे याच्याविरोधात बातमी प्रसिद्ध केली होती, ज्याचा राग मनात धरून कुंदन म्हात्रे याने सीबीडीमधील भाजप उमेदवारांच्या मदतीने ही तोडफोड केली असावी, असा दिपाली घोलप यांचा दावा आहे.
सुदिप घोलप यांनी या घटनेबाबत सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत आणि CCTV फुटेज, साक्षीदारांच्या जबान्यांसह घटनेच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.
ही घटना निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राजकीय हिंसाचाराच्या शक्यतेची चिंता वाढवणारी आहे. पोलीसांनी लवकरच या प्रकरणात कारवाई करावी, अशी अपेक्षा संबंधित पक्षांकडून व्यक्त होत आहे.

