पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने बेलापूर प्रभाग क्रमांक २७ अ मधून तेजस्वी कुंदन म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. तेजस्वी म्हात्रे यांचे पती कुंदन म्हात्रे हे पोलिसांच्या रेकॉर्डवर कुख्यात गुंड म्हणून नोंदवलेले असल्याचे आरोप होत असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भाजपविरोधात रोष व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे भाजपची ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही ओळख धूसर होऊन ‘पार्टी विथ गुंडाराज’ अशी होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
बेलापूर प्रभागातील या उमेदवारीबाबत स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त माहितीनुसार, कुंदन म्हात्रे यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न), ३८४ (खंडणी), १४३ (बेकायदेशीर जमाव), १४७ (दंगा), ५०६ (धमकी) आणि ३४ (सामूहिक हेतू) यांचा समावेश आहे. याशिवाय, बॉम्बे पोलीस कायद्याच्या कलम ३७(१) आणि १३५, आयपीसी कलम ३७९ (चोरी), तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम १२ आणि १२ ए अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत. हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने कुंदन म्हात्रे हे अट्टल गुन्हेगार असल्याचे दावे केले जात आहेत.
स्थानिक सूत्रांच्या मते, तेजस्वी म्हात्रे यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बेलापूर, दिवाळे, आग्रोळी, सेक्टर ११, १५, आयकर कॉलनी आणि पारसिक हिल या भागातील रहिवाशांना गुंडगिरी आणि असुरक्षिततेच्या धोक्याची भीती वाटत आहे. “जर तेजस्वी म्हात्रे नगरसेविका झाल्या तर कुंदन म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागात गुंडाराज वाढेल आणि स्थानिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागेल,” अशी शंका एका रहिवाशाने व्यक्त केली. यामुळे मतदारांना मतदान करताना विवेकबुद्धीचा वापर करण्याचे आवाहन काही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तर, विरोधी पक्षांनी या निर्णयावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. “भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला उमेदवारी देऊन आपली प्रतिमा स्वतःच डागाळली आहे,” अशी टीका एका विरोधी पक्षातील नेत्याने केली आहे.

