पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने शिवसेना शिंदे गटा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेषतः सीबीडी प्रभाग क्रमांक २८ मधील उमेदवार वंदना शिंदे, दिपाली घोलप (सिसिटीव्ही कॅमेरा) आणि जसपाल सिंह अटवाल यांना धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना आणि यशवंत सेनेची संयुक्त बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला यशवंत सेनेचे महाराष्ट्र सरसेनापती माधव गडदे, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि यशवंत सेना ठाणे-नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजीत कोकरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना माधव गडदे यांनी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या सुमारे ३५ ते ४० हजार धनगर समाजबांधवांना आवाहन केले की, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. धनगर समाजाला पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी धनगर समाजाच्या विविध स्तरांवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. हे सर्व प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मार्गी लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मनपा निवडणुकीत धनगर समाजाचा पाठिंबा शिवसेना (शिंदे गट) साठी महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. धनगर समाजाची ही एकजूट निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकते, असे मानले जात आहे.

