पालिका प्रशासन : नवी मुंबईतील सीबीडी हे क्षेत्र एकेकाळी स्थानिक खेळाडूंसाठी क्रीडा संस्कृतीचे केंद्र मानले जायचे. व्हॉलीबॉल, क्रिकेटसह विविध खेळांच्या मोठ्या स्पर्धा येथे आयोजित होत असत. या सर्वांसाठी सर्वात मोठे आणि उपलब्ध मैदान म्हणजे राजीव गांधी मैदान होते. मात्र, आता हे मैदान स्टेडियममध्ये रूपांतरित झाल्याने स्थानिक खेळाडूंच्या प्रॅक्टिससाठी आणि खेळण्यासाठी ते उपलब्ध राहिले नाही, असा तीव्र रोष स्थानिक नागरिक आणि खेळाडूंमध्ये आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, माजी नगरसेवक गुरखे आणि नाथ यांनी पैसे कमावण्याच्या हेतूने मैदानावर स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार, स्थानिक खेळाडूंच्या गरजा, विरोध किंवा क्रीडा संस्कृतीचा पूर्णपणे विचार न करता हा प्रस्ताव मंजूर केला गेला. परिणामी, एकेकाळी मुक्तपणे खेळणाऱ्या मुलांना-तरुणांना आता स्टेडियममध्ये वादावादी करून किंवा भांडण करूनच प्रॅक्टिससाठी जागा मिळवावी लागते. तर, महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सीबीडीबाहेरील लोक येऊन क्रिकेटचे स्पर्धा भरवतात आणि सीबीडीतील खेळाडूंना मैदान उपलब्ध होत नाही.
स्थानिक खेळाडू आणि नागरिक म्हणतात, “ज्यांनी आमच्या पोरांचे मैदान ढापून त्यावर स्टेडियम बांधून पैसे कमावण्याचे साधन निर्माण केले आणि आमच्या पोरांना क्रीडा क्षेत्रात देशोधडीला लावले, अशा पक्षाच्या नगरसेवकांना आम्ही घरी पाठवणार.” गुरखे आणि नाथ यांच्या कुटुंबीयांना आता निवडणुकीत पराभूत करून घरी बसवण्याचा निर्धार सीबीडीतील जनतेने व्यक्त केला आहे.

