पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गट) महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. सीबीडी पॅनल क्रमांक ‘२८ ब’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या दिपाली सुदिप घोलप यांना शिवसेनेने पुरस्कृत उमेदवार म्हणून अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
या घोषणेनंतर दिपाली घोलप यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम, नेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, जिल्हा महिला संघठक सरोज पाटील आणि शहर प्रमुख विजय माने यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी हा पाठिंबा मिळाल्याने शिवसैनिकांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना महिला विभाग संघटक धनश्री विचारे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
दिपाली घोलप या उच्चशिक्षित महिला असून, त्यांनी प्राथमिक शिक्षण श्री गजानन विद्यालयातून तर महाविद्यालयीन शिक्षण कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधून पूर्ण केले आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी हिंदी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे.
2013 पासून सीबीडी बेलापूर भागात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या दिपाली घोलप यांनी शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि इतर नागरी समस्यांवर सातत्याने आवाज उठवला आहे. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.
दिपाली घोलप यांचे पती पत्रकार असून, ते ‘पालिका प्रशासन वृत्त समूह’चे मुख्य संपादक आहेत. घोलप कुटुंबाची शिवसेनेशी जुनी नाळ आहे. दिपाली यांचे सासरे दिलीप घोलप हे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे.
शिवसेनेच्या या पाठिंब्यामुळे सीबीडी पॅनलमधील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मूळ शिवसैनिकाला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर हा पाठिंबा शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

