पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे ४८ तास शिल्लक असताना, प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या अंतिम उमेदवारांना पक्षाचे अधिकृत A आणि B फॉर्म सुपूर्द केलेले नाहीत. यामुळे पक्षांच्या बहुतांश इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, ते सध्या ‘गॅसवर’ आहेत. जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांच्या फोनकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रमुख पक्षांच्या बहुतांश इच्छुक उमेदवारांनी उद्या (सोमवारी) अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून २९ डिसेंबरच्या मध्यरात्री अंतिम उमेदवारांना गुपचूप A-B फॉर्म देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षनेत्यांकडून “तुम्हालाच नगरसेवक करू” असे आश्वासन मिळालेल्या इच्छुक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असली तरी, प्रमुख पक्षांमधील जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे अर्ज दाखल करण्यास उशीर होत आहे. नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा घेत महाविकास आघाडी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असून, यानंतर पक्षीय उमेदवारांना अपक्ष म्हणून लढावे लागण्याची नामुष्की ओढवू शकते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि नियोजनबद्ध होण्यासाठी राजकीय पक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना ‘अपक्ष’ लढण्याची वेळ?
1–2 minutes
