पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीबीडी भागात भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. गत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी जोरदार प्रचार करणाऱ्या सुरेखा नरबागे, स्वाती गुरखे साटम, अशोक गुरखे आणि डॉ. जयाजी नाथ इत्यादीनी नंतर राजकीय भीतीपायी भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे तिघे भाजपकडून महापालिका निवडणुकीत सीबीडी पॅनल क्रमांक 28 अ, ब, आणि क मधून उमेदवारी मागत असल्याने स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) चे संदीप नाईक यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सुरेखा नरबागे, स्वाती गुरखे साटम, अशोक गुरखे आणि डॉ. जयाजी नाथ यांनी राष्ट्रवादीसाठी खुलेपणाने प्रचार केला होता. मात्र, राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर आणि सत्तेच्या समीकरणांमुळे या सर्वांनी आत्मसमर्पण करत भाजपचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये प्रवेश केला.
आता महापालिका निवडणुकीत यातील तिघांनी सीबीडी पॅनल क्रमांक 28 मधून तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सीबीडी भागातील भाजपचे जुनेजाणते आणि हिंदुधर्म निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “भाजपविरोधी प्रचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांनाच तिकीट देणे हे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय आहे,” असे मत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
सीबीडीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे की, या तिघांना तिकीट दिल्यास त्यांना ‘घरी बसवण्याचा’ निर्धार कार्यकर्ते करत आहेत. याचा अर्थ उमेदवारी मिळाल्यास बंडखोरी किंवा मतदानात विरोध करणे असा होऊ शकतो. नवी मुंबई महापालिका निवडणूक जवळ आलेल्या पार्श्वभूमीवर ही नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सीबीडी_भाजप विरोधता काम करणाऱ्यांना उमेदवारी मिळाल्यास ‘घरी बसवणार’
1–2 minutes
