पालिका प्रशासन : नवी मुंबई भारतीय जनता पार्टीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद उफाळून आला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्याकडे उमेदवारी निश्चिती आणि अंतिम करण्याचे पूर्ण अधिकार राहिलेले नाहीत, असे चित्र दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे बहुतांश निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्ते दलबदलू किंवा संधी साधू नेत्यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी डॉ. पाटील यांच्याकडे सातत्याने भेटी घेऊन विनंत्या करत आहेत. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या स्वतःच्या घरातच त्यांचा सख्खा भाऊ काशिनाथ पाटील आणि पुतणी प्रणाली पाटील उमेदवारीस इच्छुक आहेत. त्यांना तिकीट मिळावे यासाठी कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून डॉ. पाटील संपूर्ण जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नाराज करत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना उमेदवारी देऊ नये, अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असून, उमेदवारी वाटपात पारदर्शकता आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, कुटुंबीयांना प्राधान्य दिल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपच्या प्रदेश नेत्यांकडून लवकरच उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता असून, हा वाद कसा मिटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

