पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीच्या चर्चा निरर्थक ठरून, जवळपास फिसकटल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नसल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक असताना, बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास प्राधान्य देणार आहेत.
शिंदेसेना आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चेसाठी दोन बैठका झाल्या, परंतु जागावाटपावरून मतभेद कायम आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडी (MVA)मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात असून, घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी अर्ज छाननीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. योग्य वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, मनसे आणि शिवसेना उबाठा एकत्रितपणे आपली चूल मांडणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा केलेली नाही. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजप-शिंदेसेना युतीच्या चर्चा ठरल्या ‘निरर्थक’?
1–2 minutes
