1–2 minutes

पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या पुत्र निलेश म्हात्रे यांना सीबीडी बेलापूर विभागातील पॅनल क्रं ’28 क’ मधून भाजपची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळण्याची शक्यता समजताच आमदार म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

आमदार म्हात्रे यांनी आपल्या निवासस्थानी समर्थक इच्छुक उमेदवारांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. पॅनल ’28 क’ मधून भाजपकडून ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी तसेच चार वेळा पक्ष बदललेले जयाजी नाथ हे निवडणुकीस इच्छुक आहेत. मात्र, एकेकाळी सीबीडी विभागातून नगरसेविका असलेल्या आ. म्हात्रे यांना आपल्या पुत्राला उमेदवारी मिळवून नगरसेवक बनवण्याची घाई दिसत आहे.

उमेदवारी वाटपाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या ज्येष्ठ पुत्र व माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे सोपवल्याने निलेश म्हात्रे यांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. याचबरोबर आमदार म्हात्रे यांच्या समर्थक इच्छुक उमेदवारांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

आपल्या विधानसभा क्षेत्रातच स्वपुत्र व समर्थकांना उमेदवारी मिळवून देऊ न शकल्याची शक्यता असल्याने, आमदार म्हात्रे यांच्यावर छुपी टीका होऊ लागली आहे. पक्षातील अंतर्गत समीकरणे पाहता त्यांचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महापालिका निवडणुकीत घराणेशाही आणि उमेदवारी वाटपावरून भाजपातच खदखद सुरू असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started