पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सीबीडी विभागातील पॅनल क्रमांक ’28 क’ मधून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळवण्यासाठी पक्षाचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते सी. व्ही. रेड्डी आणि तीन वेळा पक्ष बदललेले डॉ. जयाजी नाथ यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. मात्र, दोघांपैकी फक्त एकालाच तिकीट मिळणार असल्याने पक्ष कोणाच्या बाजूने निर्णय घेईल, याबाबत उत्सुकता आहे.
प्राप्त माहितीनुसार, सी. व्ही. रेड्डी यांना बेलापूरच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांचा मजबूत पाठिंबा आहे. तर डॉ. जयाजी नाथ हे नाईक गटाचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. नाथ यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. त्यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार केला असल्याने त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, स्थानिक नागरिकांमध्येही डॉ. जयाजी नाथ यांच्या विरोधात नाराजी आहे. त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात एकही उल्लेखनीय नागरी सुविधांचे काम केले नाही, तसेच ते सीबीडी क्षेत्रात वास्तव्यही करत नाहीत, असा आरोप नागरिक करत आहेत.
दुसरीकडे, भाजपचा महापालिकेत एकही नगरसेवक नसताना पक्षाची धुरा सांभाळणारे सी. व्ही. रेड्डी यांच्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा आहे. पक्ष त्यांच्या निष्ठा आणि स्थानिक कामगिरीचा विचार करून त्यांना प्राधान्य देऊ शकतो, असे सूत्रांकडून समजते.

