पालिका प्रशासन/पनवेल :राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–2025 चा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी जाहिर करण्यात आला आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांची आज दिनांक 16 डिसेंबर रोजी मुख्यालयात निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेसाठी बहुसदस्यीय पद्धतीने 20 प्रभागातील 78 जागांसाठी निवडणूक होणार असून 15 जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार तसेच महानगरपालिका व इतर शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक निवडणूक विभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची व्यवस्था, उमेदवारी अर्जांची छाननी, मतदान, मतमोजणी तसेच आयोगाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे अशा विविध तरतूदींवरती यावेळी चर्चा करण्यात आली.
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार कामकाज पार पाडण्याचे निर्देश दिले असून, राजकीय पक्षाशी व पोलिस विभागाची बैठक तसेच मतदान प्रशिक्षणाबाबत यावेळी नियोजन करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निष्पक्ष व शांततेत पार पडाव्यात, यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग क्रमांक 1,2,3 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारत वाघमारे (जिल्हाधिकारी –पुर्नवासन, रायगड) यांची नियुक्ती केली आहे. तसेच अर्चना प्रधान आणि नितीन राठोड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 4,5,6 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर खुटवड (उपविभागीय अधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. तसेच संतोष मांढरेआणि नितीन राठोड यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 7,8,9,10 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित शेडगे ( मुद्रांक जिल्हाधिकारी) यांची नियुक्ती केली आहे. नरेश पेढवी, विशाल हुडेकर,यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 11,12,13 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविशकुमार सोनोने( उपजिल्हाधिकारी मेट्रो) यांची नियुक्ती केली आहे. रविंद्र सानप आणि सिध्दार्थ कांबळे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 14.15.16 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ललिता बाबर( उपायुक्त नवी मुंबई मनपा) ) यांची नियुक्ती केली आहे. जितेंद्र इंगळे आणि सौरभ परभरणकर यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभाग 17.18 19 ,20 चे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवन चांडक (उपविभागीय अधिकारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत फुलपगारे आणि कविता मोकल यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

