पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) पक्षप्रवेशांची रांग लागली असून, शिवसेना उबाठा गट, NCP शरद पवार गट आणि काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते व कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत. निवडणूक घोषणेनंतर चोवीस तासांच्या आत उबाठा गटातील 3 (मढवी परिवार) आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम मिथुन पाटील व अमित पाटील अश्या 2 नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, महायुतीतील भाजप आणि शिंदे सेना यांच्यात नवी मुंबई महापालिकेसाठी युती होणार की नाही, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली असून, युती झाली तरी सर्वांना उमेदवारी देणे दोन्ही पक्षांना अशक्य असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर भाजप नेते गणेश नाईक आणि शिंदे गटात जुना संघर्ष असल्याने युतीला अडथळे येत आहेत. महायुतीच्या राज्यस्तरीय फॉर्म्युल्यात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, कल्याणसारख्या काही महापालिकांमध्ये भाजप-शिंदे युती निश्चित झाली असली तरी नवी मुंबईबाबत अद्याप स्पष्टता नाही. काही सूत्रांच्या मते, येथे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता अधिक आहे.

