1–2 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिघा विभागातील पॅनल क्रं. १ मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार विरेश सिंह यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने मराठी भाषिक आणि अमराठी अर्थात उत्तर भारतीय भाषिकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विरेश सिंह हे भाजपचे दिघा मा. मंडळ अध्यक्ष असून, त्यांच्या पोस्टमध्ये “उत्तर भारतीय समाजाची आन बाण आणि शान” असा उल्लेख केल्याने हा वाद उद्भवला आहे. काही मराठी भाषिक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मते, ही पोस्ट परप्रांतीय उत्तर भारतीय समाजाला लक्ष्य करून मराठी मतदारांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न दर्शवते. यामुळे असा आरोप होत आहे की, या उमेदवाराला मराठी मतदारांची मते नको आहेत किंवा दिघा विभागात उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण एवढे मोठे आहे की, मराठी मतांशिवायही निवडणूक जिंकता येईल असा विश्वास आहे.

या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकारणात भाजपवर परप्रांतीयांच्या माध्यमातून मराठी माणसावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरत आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर संवेदनशील असलेल्या स्थानिकांना ही पोस्ट मराठी भाषिकांविरोधी वाटत असून, याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started