पालिका प्रशासन/नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-४ येथील स्मशानभूमीतील विद्युत खांब व लाईट्स बसविण्याच्या कामात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल घोलप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये निघालेल्या या टेंडरची मुदत फक्त एक महिना होती. मात्र, काम अपूर्ण असतानाच ठेकेदाराला पूर्ण रक्कम देण्यात आल्याचे घोलप यांचे म्हणणे आहे. कामाचा सर्व्हे, इन्स्पेक्शन अहवाल किंवा पूर्णत्वाचा दाखला नसतानाही पैसे देणे, हे थेट भ्रष्टाचाराचे लक्षण असल्याचा दावा त्यांनी केला.
घटनास्थळी पोहोचलेल्या घोलप यांना ठेकेदाराने सांगितले की, “हे काँट्रॅक्ट मला निखिल मांडवे यांनी दिले आहे.” मात्र काही वेळातच रंगनाथ औटी हे उपअभियंता संदीप ठाकूर यांच्यासोबत आले आणि “हे माझे काँट्रॅक्ट आहे, ही माझी साईट आहे, मीच याचा काँट्रॅक्टर आहे,” असे जाहीरपणे सांगू लागले. यावेळी त्यांनी घोलप यांना धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोपही आहे.
या प्रकरणात माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांनी स्वतः ठेकेदाराची भूमिका घेऊन निकृष्ट दर्जाचे काम करून महापालिकेची कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा संशय घोलप यांनी व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासन मात्र आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता अधिक बळावली आहे.
स्वप्निल घोलप यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे रंगनाथ औटी यांना ठेकेदार (असल्यास) म्हणून ब्लॅक लिस्टेड करण्याची व संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची लेखी मागणी केली आहे. जनतेच्या पैशाची होणारी लूट थांबवण्यासाठी आयुक्त कोणता निर्णय घेतील, याकडे नेरुळवासीयांचे लक्ष लागले आहे.

