1–2 minutes

पालिका प्रशासन/क्राईम न्युज : खारघर (नवी मुंबई पोलीस आयुक्तालाय) येथील प्रसिद्ध बिल्डर कंपनी “मे. अधिराज कंस्ट्रक्शन प्रा. लि.” चे मालक निकुंज गुप्ता, ब्रिजभूषण गुप्ता आणि कुंजबिहारी गुप्ता यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात मोठ्या घरफसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी सुरज सायबन्ना गुरव यांच्यासह एकूण ८ घरखरेदीदारांनी २००९ पासून आतापर्यंत या कंपनीकडे एकूण ७ कोटी २९ लाख ५७८ रुपये गुंतवले होते; मात्र प्रत्यक्ष फ्लॅटचे वाटप तर सोडाच, गुंतवलेली मूळ रक्कम आणि १५ टक्के वार्षिक व्याजही परत मिळाले नाही.

गुन्हा दाखल झालेल्या “द लँडमार्क” या प्रकल्पात सेक्टर-७, खारघर येथील सर्व्हे नं. ६९, मौजे रोहिणजण (ता. पनवेल) येथे कंपनीने फ्लॅट्स विक्रीसाठी ऑफर दिले होते. फिर्यादीनुसार, बिल्डरांनी विश्वास संपादन करून ग्राहकांना आगाऊ रक्कम घेतली, वारंवार मुदतवाढ दिली आणि शेवटी फ्लॅटही दिले नाहीत किंवा पैसे परत केले नाहीत. यामुळे केवळ ८ फिर्यादींनाच नव्हे तर आणखी शेकडो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खारघर पोलीस ठाण्यात हा गुन्हा भा.द.वि. कलम ३१८(२), ३१६(२), ३(५) तसेच एम.पी.आय.डी. कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. ४७८/२०२४). फिर्यादी सुरज गुरव यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सध्या तरी आरोपी बिल्डर तिघे फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे खारघर-कामोठे परिसरातील इतर अनेक प्रकल्पांतील ग्राहकांमध्येही घबराट पसरला आहे. पोलीस अधिक तपास करीत असून, आणखी किती ग्राहक फसले आहेत याचा आकडा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started