1–2 minutes

पालिका प्रशासन : बेलापूर व ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांना निवडून आल्याला एक वर्ष पूर्ण झाले तरी शहरात कुठेही आनंदोत्सवाचा माहोल दिसला नाही. महाराष्ट्रातील इतर भागांत पक्षकार्यकर्ते आपापल्या आमदारांच्या वर्षपूर्तीला उत्साहाने शुभेच्छा देत असताना, नवी मुंबईत मात्र समर्थकांमध्ये प्रचंड निराशा व असंतोष दिसून येतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आमदार एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात आणि अंतर्गत भांडणात व्यस्त असल्याने जनहिताच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. तर, अटीतीच्या लढतीत अवघ्या 377 मतांनी निवडून आलेल्या बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला असला, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचा अभाव जाणवतो.

गेल्या वर्षभरात नवी मुंबईकरांना थेट फायदा होईल असा एकही मोठा प्रकल्प किंवा योजना आमदारांनी आणली नाही, असा थेट आक्षेप जनतेतून होत आहे. खासगी शाळा-महाविद्यालये व खाजगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लुट, सायन पनवेल मार्गाची झालेली दुर्दशा, फसलेले महिलांचे उद्योजक सक्षमीकरण, युवा बेरोजगारी, कामगार कल्याण अश्या मुद्द्यांवर दोन्ही आमदार मौन बाळगतात, असेही बोलले जात आहे. परिणामी, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीची लाट आहे आणि आमदारांच्या वर्षपूर्तीला शहरात ‘शून्य आनंदोत्सव’ पाहायला मिळाला. 


Design a site like this with WordPress.com
Get started