1–2 minutes

पालिका प्रशासन : नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलापूर गाव पंचशील नगर -2 मध्ये शुक्रवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२५) एका २२ वर्षीय गरोदर महिलेवर आरोपी काशिकांत शर्मा याने काचेच्या तुकड्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्याची दखल घेऊन एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २२ नोव्हेंबर) एफआयआर क्रमांक ४२६/२०२५ नोंदवण्यात आला आहे.

मात्र, सदर गुन्ह्यात अत्यंत गांभीर्याने हत्येचा प्रयत्न आणि गरोदर महिलेवर जाणीवपूर्वक गंभीर इजा पोहोचवल्याचे स्वरूप असतानाही पोलीसांनी भारतीय न्याय संहितेची (बीएनएस) कलमे १०९ (हत्येचा प्रयत्न) आणि १२४ (गरोदर महिलेला तिच्या गरोदरपणाची जाणीव असताना गंभीर दुखापत करणे) समाविष्ट केलेली नाहीत, याकडे नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक माजी नगरसेविका पूनम मिथुन पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

सौ. पाटील यांनी पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, बेलापूर यांना निवेदन पत्र लिहून या दोन्ही कठोर कलमांचा तात्काळ समावेश करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्याची विनंती केली आहे. “हा केवळ वैयक्तिक गुन्हा नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारे कृत्य आहे. अशा अमानुष कृत्यांना आळा घालण्यासाठी व पीडित महिलेला तातडीने न्याय मिळण्यासाठी योग्य कलमांचा अंतर्भाव आवश्यक आहे,” असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

सध्या पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी सदर पीडित महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि विचारपूसही करत तिला न्याय मिळवून देण्याचा दिलासा दिला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून काँग्रेसने याप्रकरणी त्वरित व संवेदनशील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started