पालिका प्रशासन : नवी मुंबईतील विविध रेल्वे स्टेशन संकुलात आणि स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे लहान-मोठे व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. फेरीवाला, हातगाडे, खाद्यपदार्थांची दुकाने अशा स्वरूपात हे व्यवसाय सुरू असल्याने प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.
रेल्वे कायद्यानुसार स्टेशन परिसराच्या ५०० मीटर अंतरापर्यंतच्या सार्वजनिक वापराच्या जागांवर कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यापार करता येत नाही. तरीही या नियमाचा सर्रास भंग होत असून, रेल्वे प्रशासन आणि स्टेशन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले सिडको प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
या अनधिकृत दुकानांमुळे स्टेशन परिसरात कचरा, गैरसोय आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या असून, बेकायदा स्थलांतरितांच्या उपस्थितीमुळे स्थानिकांना रोजगारावरही गदा येत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येत्या काही दिवसांत पोलिस व महापालिका यंत्रणेने संयुक्त मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.


