1–2 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नेरुळ सेक्टर-५४ येथील रहिवासी असलेले ४३ वर्षीय व्यवसायिक सौरभकुमार राकेश अग्रवाल यांची ऑनलाईन ट्रेडिंग ऍपच्या नावाने तब्बल ३२ लाख २४ हजार ९०१ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरून मिळालेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी गुंतवणूक केली होती; मात्र नफा दाखवून पैसे काढण्यास मज्जाव केल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्यांनी एनआरआय पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

श्री. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना “मनीसुख” (Moneysukh) नावाच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात दिसली. त्या रीलमधील लिंकवर क्लिक केल्यावर ते थेट व्हॉट्सअ‍ॅपवर “Poulomi Nath Moneysukh Delhi” या नावाच्या ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या व्यक्तीने (व्हॉट्सअ‍ॅप क्र. ९६०१४१९५२१) ट्रेडिंग अॅपची लिंक पाठवली आणि त्यानुसार अग्रवाल यांनी “मनीसुख” नावाचे ऍप डाउनलोड करून त्यात यूजर आयडी व पासवर्ड तयार केले.

ऍपमध्ये सुरुवातीला छोटी गुंतवणूक केल्यानंतर खूप जास्त नफा दिसू लागल्याने त्यांनी हप्त्या-हप्त्याने एकूण २१,३७,४३० रुपये गुंतवले. ऍपमध्ये त्यांच्याकडे ४२ लाख रुपये शिल्लक दाखवले जात होते. नफा काढण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी ऍपमधील कस्टमर केअरला संपर्क साधला असता, “कमिशन” आणि “टॅक्स”च्या नावाने आणखी पैसे भरण्यास सांगितले गेले. त्यानुसार त्यांनी १५ ऑक्टोबरला ४,८७,४७१ रुपये आणि  १७ ऑक्टोबरला ६,००,००० रुपये असे एकूण १०,८७,४७१ रुपये अतिरिक्त भरले.

पैसे भरल्यानंतरही खातेातून पैसे काढता येत नसल्याने आणि कस्टमर केअरचा प्रतिसाद बंद पडल्याने अखेर त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवली असून त्यांचा तक्रार क्रमांक ३१९११२५०२०८८५२ आहे. सदर प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९६०१४१९५२१ आणि “मनीसुख” नावाच्या बनावट ऍपच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर येणाऱ्या “जास्त नफ्याच्या” गुंतवणूक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. SEBI किंवा RBI मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्मशिवाय कोणतीही गुंतवणूक करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started