पालिका प्रशासन : नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिंहासनारुढ पुतळ्याभोवती सुरू असलेला वाद आणखी चिघळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर रोजी परवानगी न घेता पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पुन्हा पुतळा बंदिस्त केल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी मनसेकडून मध्यरात्री ३ वाजता १५ फुटी जाळी लावून पुतळा बंदिस्त केल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.
मनसेचे नवी मुंबई प्रदेश प्रवक्ते तथा शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सोशल मीडियावरून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मध्यरात्री चोर, दरोडेखोरासारखे येऊन नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून महाराजांच्या पुतळ्याला मध्यरात्री ३ वाजता १५ फुटी जाळीने बंदिस्त करतात? हे कळायला नवी मुंबईतील जनता दुधखुळी नाही. स्मारक खुले केल्यानंतर परत एकदा महाराजांना बंदिस्त करून पोलिस बंदोबस्त लावला आहे. तमाम शिवभक्त, शिवप्रेमींच्या भावना मातीमोल करण्याचे पाप या सरकार आणि प्रशासनाने केले आहे. हा महाराजांचा महाराष्ट्र आहे! कितीही जोर लावा, महाराष्ट्र सैनिक परत एकदा गनिमी काव्याने स्मारक खुले करणार. शेवटी इतिहास लढणा-यांची दखल घेतो… पळणा-यांची नाही!”
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, नेरुळ सेक्टर १ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे ४६ लाख रुपये खर्चून उभारलेला हा पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आला होता. मनसेने याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेकडून अनावरण केले जात नव्हते. १६ नोव्हेंबर रोजी अमित ठाकरे नवी मुंबईत आले असता त्यांनी पुतळा पाहिला आणि स्वतः हाताने धुऊन जलाभिषेक करून अनावरण केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मात्र, अनावरणानंतर अवघ्या काही तासांतच महापालिका प्रशासनाने पुतळा पुन्हा बंदिस्त केल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. मनसेने याला शिवरायांच्या अवमानाचे पाप म्हटले असून, पुतळा परत खुले करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, १६ नोव्हेंबरच्या अनावरण प्रकरणी नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरे, गजानन काळे आणि सुमारे ७० मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेची परवानगी न घेता अनावरण केल्याचा आरोप आहे. अमित ठाकरे यांनी याबाबत अभिमान व्यक्त करताना म्हटले आहे की, “महाराजांसाठी माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला याचा अभिमान आहे.”
तर मनसेने पुतळा तात्काळ खुला करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

