पालिका प्रशासन/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आज अविस्मरणीय अनुभव घेतला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या ‘स्मार्ट स्टुडन्ट एक्झाम’मध्ये टॉप टेन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी), थुंबा, तिरुवनंतपुरम, केरळ येथे भेट देण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने विमानाने थेट केरळला रवाना झालेल्या या विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच विमानप्रवास होता. या ऐतिहासिक भेटीदरम्यान त्यांनी रॉकेट प्रक्षेपण पाहिले आणि विविध अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रतिकृतींचे दर्शन घेतले.
व्हीएसएससी केंद्रात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रथम रॉकेट प्रक्षेपणाचे थरारक दृश्य पाहिले. तसेच, संग्रहालयात भारताच्या अवकाश मोहिमांच्या वैभवाची साक्ष अनुभवली. येथे चंद्रयान-३ ची प्रतिकृती, स्टॅलायट्स, आर्यभट्ट, रोहिणी-२०० यांसारख्या ऐतिहासिक अवकाशयानांचे मॉडेल्स आणि विविध रॉकेट्सचे संग्रह पाहून विद्यार्थी भारावले. विशेष म्हणजे, भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम ‘गगनयान’ कशी असेल याची प्रतिकृती अधिकाऱ्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितली. या मोहिमेच्या माध्यमातून अवकाशवीर कसे तयार होतात आणि भारताचे अवकाश कार्यक्रम जगासमोर कसे उजळून निघत आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
इस्रो अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, “तुम्ही इथे कसे आलात?” यावर स्मार्ट एक्झाम आणि आयुक्त श्रीकांत यांच्या प्रेरणेची कथा सांगितली असता, त्यांनी कौतुकाने रॉकेटची प्रतिकृती आयुक्तांसाठी भेट म्हणून दिली. ही भेट मनपेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असून, विद्यार्थ्यांसाठी अवकाशसपाटीचे द्वार उघडणारी ठरली. या विद्यार्थ्यांमध्ये मनपा प्राथमिक शाळा नारेगाव, सिडको एन-७, हर्सूल, इंदिरानगर बायजीपुरा, विटखेडा आणि मिटमिटा या शाळांचे प्रतिनिधी आहेत.
या दौऱ्यात उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि शिक्षक किरण ताबडे, मंगेश जाधव, उमा पाटील, सविता बांबर्डे यांचा सहभाग होता. विद्यार्थी उद्या सायंकाळी विमानाने परत छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत. आयुक्त श्रीकांत यांनी या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढवण्याचा प्रयत्न केला असून, भविष्यात असे अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले. या भेटीने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उड्डाण मिळाले आहे.

मनपाच्या स्मार्ट विद्यार्थ्यांची ISROला भेट
1–2 minutes
