पालिका प्रशासन/सुदिप घोलप : वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर आणि नेरूळ शाखांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली सात वर्षे सातत्याने राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही उत्साहपूर्ण स्वरूपात घेतला जाणार असून, किशोरवयीन मुला-मुलींना वैचारिक जागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेची पहिली दोन वर्षे प्रत्यक्ष स्वरूपात घेण्यात आली. मात्र, २०२० ते २०२२ या कालावधीत कोविड-१९ महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ती ऑनलाइन पद्धतीने पार पडली. २०२३ पासून पुन्हा प्रत्यक्ष स्वरूपात सुरू झालेल्या या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. समितीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सुप्रसिद्ध कलाकार किरण माने यांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तक स्वरूपात बक्षिसे प्रदान केली जातील.
या वर्षीची स्पर्धा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पीपल्स एज्यूकेशन सोसायटीचे सेंट्रल स्कूल, सेक्टर-१, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे समितीच्या संपर्क क्रमांकांवर नोंदवावीत, असे आवाहन समितीने केले आहे. नोंदणीसाठी राजीव देशपांडे (९१३६१०९८४५) किंवा रमेश साळुंखे (९२२४३४०७२०) यांच्याशी संपर्क साधावा.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी म्हणाले, “हा उपक्रम केवळ वक्तृत्वाची कला शिकवण्यापुरता मर्यादित नसून, शहीद भगतसिंगांच्या विचारसरणीने विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनाची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे पुढील पिढी अंधश्रद्धांपासून मुक्त होईल, ही आमची अपेक्षा आहे.” स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समितीने पालक आणि शाळांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


