पालिका प्रशासन/सुदिप घोलप: नवी मुंबईतील वाशी सेक्टर 30 येथील नियोजित महाराष्ट्र भवनाच्या बांधकामासाठी दुसऱ्यांदा भूमिपूजन होणार असल्याची माहिती समोर आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील वर्षी, ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, आता एकाच भवनासाठी पुन्हा भूमिपूजन करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे भूमिपूजन विद्यमान उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.
या दुबार भूमिपूजन सोहळ्यास विविध स्तरातून टीका होत असून, एकाच प्रकल्पासाठी दोनवेळा भूमिपूजन करणे हे कर भरणाऱ्या जनतेच्या पैशांचा शासकीय तिजोरीतून अपव्यय असल्याची टीका होत आहे. सुजान नागरिकांचे म्हणणे आहे की, हे भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत उदाहरण आहे. तर, मागील भूमिपूजनानंतर एक वर्ष उलटले तरी बांधकामाला वेग येत नसल्याने अशा पद्धतीने कार्यक्रमासाठी सारखे करोडो रुपये खर्च करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र भवन हा प्रकल्प नवी मुंबईतील मराठी संस्कृती व सुविधांसाठी महत्त्वाचा असला तरी, पायाभूत कामे पूर्ण झाली नाहीत तरी पुन्हा भूमिपूजनाचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला असला तरी, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रे सांगतात. भूमिपूजनाच्या तयारीसाठी नवीन निमंत्रण पत्रिका व कार्यक्रमाची व्यवस्था सुरू असल्याचे कळते. मात्र, यामुळे जनतेच्या कर रुपी पैशांचा कसा खर्च होत आहे, याची जबाबदारी कोण घेणार, हा मोठा प्रश्न आहे. विरोधी पक्षांनी यावर आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणाने नवी मुंबईच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला असून, पारदर्शकतेची मागणी वाढत आहे.


