1–2 minutes

पालिका प्रशासन/ठाणे : विविध प्रसार माध्यमांनी “नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर बोगस मतदारांची नोंदणी” अशी बातमी प्रसिद्ध केली होती. सदर बातमीसंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाब वास्तवाशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदार यादी भाग क्रमांक 300 मध्ये “नेरुळ सेक्टर 21, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास” असे सेक्शनचे नाव नमूद आहे. येथे “मनपा आयुक्त निवास” हे केवळ विभागाचा (सेक्शन) ठळक ओळखचिन्ह (Landmark) म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराचा पत्त्यामध्ये / वर “नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान” असे नमूद नाही. त्यामुळे संबंधित बातमीत नमूद केलेली “130 मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे” ही माहिती वास्तवाशी विसंगत आहे.

मतदार यादी भाग क्रमांक 148 संदर्भात वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या “सुलभ शौचालय” विषयक उल्लेखाबाबत तपास करण्यात आला असता, हे ठिकाण दोन मजली असून पहिला व दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील मतदार हे यापूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते, मात्र सध्या त्या तेथून स्थलांतरित झालेल्या असून विहित कार्यपद्धतीनुसार त्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरु आहे.

तर, मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार, वृत्तपत्रात प्रकाशित बातमीत कोणतेही प्रकारचे तथ्य आढळून नाही, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started