पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा कामे माजी नगरसेवकांना निधी मंजूर करून करण्यात येत असल्याचे काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः चुकीचे व विपर्यास्त असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने महानगरपालिकेने याबाबतची वस्तुस्थिती जाहीर केली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी आवश्यक नागरी सेवा-सुविधा कामांची पूर्तता क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनांवरून केली जाते. या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खातरजमा केल्यानंतर रितसर मान्यता व विहित प्रक्रिया पूर्ण करूनच कामे हाती घेतली जातात. यात प्रामुख्याने नागरिकांच्या गरजा व सुविधांचा विचार केला जातो; अन्य कोणत्याही बाबींचा समावेश होत नाही.
वास्तविक, सन २०२० पासून नवी मुंबई महानगरपालिकेत कोणतेही नगरसेवक नाहीत. त्यामुळे नगरसेवक निधी किंवा माजी नगरसेवकांसाठी निधी मंजुरीचा प्रश्नच उद्भवत नाही. १९९५ ते २०१५ या कालावधीत झालेल्या पाच निवडणुकांतील निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी हे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे “माजी नगरसेवकांना कोटींची कामे मंजूर” असे विधान दिशाभूल करणारे व निरर्थक आहे.
सन २०२० पासून महानगरपालिकेचे संपूर्ण कामकाज आयुक्त तथा प्रशासकांच्या मार्फत नियमानुसार चालते. कोणत्याही नागरी सुविधा कामासाठी माजी नगरसेवकांना स्वतंत्र निधी देण्यात आलेला नाही. सर्व कामे स्थानिक गरजांनुसार, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शिफारशी व मान्यतेच्या आधारे केली जातात.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये. नागरी सुविधा कामे ही केवळ आवश्यकता व नियमानुसारच पूर्ण केली जातात. कोणत्याही व्यक्ती किंवा गटाला विशेष निधी मंजूर करण्यात आलेला नाही.




