पालिका प्रशासन/सुदिप घोलप : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार गटाने नवी मुंबईत नवचैतन्य निर्माण करणारी बैठक उत्साहात पार पाडली. या राष्ट्रवादी परिवार संवाद बैठक व जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात हजारो कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणापैकी एक म्हणजे डॉ. मंगेश आमले यांना नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना डॉ. आमले म्हणाले, “ही माझ्यासाठी अभिमानास्पद व जबाबदारीची वेळ आहे. पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरवत, नवी मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि राष्ट्रवादीच्या पुरोगामी विचारांसाठी अखंड परिश्रम घेईन.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि घोषणांनी सोहळा अधिक उत्साही केला.
डॉ. मंगेश आमले हे IIT मुंबई, IIT जम्मू आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे D.Litt, PhD, MBA, PGDCS, DIM आणि EMBA अशा एकूण १४ उच्च पदव्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. आमले यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ कार्य केले आहे. नवी मुंबईत जनतेचा विश्वास जिंकलेल्या त्यांच्या कुटुंबाचा गेल्या ५० वर्षांचा सामाजिक वारसा आणि स्थानिक विकासातील योगदान यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला.
बैठकीत आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा झाली. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवरांची मोठी उपस्थिती उत्साह वाढवणारी ठरली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरोगामी विचारसरणीला अनुसरून, डॉ. आमले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या सोहळ्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष मजबूत होण्यास मदत होईल, असे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.



