पालिका प्रशासन/सुदिप घोलप : प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वकील, ज्यांनी संयुक्त राष्ट्रसंघापासून जी-२० पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, तेही एका तरुणीच्या जाळ्यात अडकले आणि तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक झाली. ही घटना मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात ३ ऑक्टोबरला दाखल झालेल्या एफआयआरमधून समोर आली असून, ती केवळ व्यक्तिगत फसवणुकीपुरती मर्यादित नसून, डिजिटल युगातील ‘सेक्सटॉर्शन’च्या धोक्याची भयावहता उघड करणारी आहे. गोरेगाव पोलिसांनी पारुल राणा (२८, मध्य हिमाचल प्रदेश मूल, मुंबई राहणारी मॉडेल) तिच्या आई मीना राणा, वडील अरविंदर सिंग राणा, बहीण निधी राणा आणि मित्र कोनिका वर्मावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०८(२) (धमकी), ३१८(४) (फसवणूक), ३५६ (विनयभंग) आणि ६१२ (गुन्हेगारी षड्यंत्र) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार दाखल करणारे ५१ वर्षीय वकील (नाव गोपनीय ठेवण्यात आले असले तरी एफआयआरमध्ये ‘रणजन’ म्हणून उल्लेख) मुंबईतील शासकीय प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत असून, त्यांचे शिक्षण आंतरराष्ट्रीय कायदे, विदेशी व्यापार कायदे यामध्ये झाले आहे.
मे २०२४मध्ये पारुल राणाशी वकीलांची ओळख झाली, तीही त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी कॉमन मित्रांच्या माध्यमातून. सुरुवातीला इंस्टाग्रामवर बोलणे, फोन नंबरांची देवाणघेवाण आणि हळूहळू जवळीक वाढली. जून २०२४मध्ये वकील स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले असताना, पारुलने रात्री उशिरा रडत फोन केला. तिने नातेवाईकांच्या आजारी पडल्याचा हक्काचा सांगून ५० लाख रुपयांची मागणी केली. वकीलांनी मात्र अडीच लाख रुपये पाठवले. भारत परतल्यावर पारुलने मुंबईत भेट घेण्याचा आग्रह धरला, पण वकील गोव्याच्या कामासाठी गेल्याने भेट झाली नाही. जुलैमध्ये तिने मॉडेलिंग शूटिंगच्या नावाखाली पुन्हा अडीच लाखांची मागणी केली आणि प्रत्यक्ष भेटीत ही रक्कम मिळाली. यावेळी वकीलांनी स्पष्ट केले की, ‘माझे लग्न झाले आहे, मला मुलगी आहे, मागे लागू नका.’ तरीही त्यांच्या निवासस्थानी शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, जे नंतरच्या धमक्यांचा आधार ठरले.
पुढील घटनाक्रम अधिक धक्कादायक आहे. पारुलने शूटिंगच्या नावाने १० लाखांची मागणी केली, त्यावर वकीलांनी मित्राच्या कंपनीच्या खात्यातून ५ लाख पाठवले. चंदीगडला गावी जाण्यासाठी मुंबई विमानतळावर १ लाख दिले. ३१ जुलैला पारुल आणि तिची बहीण निधी राणा वकीलांच्या घरी आल्या, तिथे राहिल्या आणि १० लाख घेऊन गेल्या. त्यानंतर दोघे बाली (इंडोनेशिया) ट्रिपला गेले, जेथे सारा खर्च वकीलांनी केला. तरीही पारुलने २० लाखांची ‘अर्जेंट’ मागणी केली. वकीलांनी नकार दिल्यावर तिने खाजगी फोटोंचा आधार घेऊन खोट्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी दिली. घाबरलेल्या वकीलांनी लाखो रुपये पाठवायला सुरुवात केली. एफआयआरनुसार, गुगल पे, फोन पे आणि मित्रांच्या खात्यांद्वारे ५० लाखांहून अधिक पैसे हस्तांतरित झाले. उशीर झाल्यास पारुलचे कुटुंबीय – वडील, आई, बहीण आणि कोनिका – वकीलांना फोन करून ‘रेप’ची धमकी देत असत.
एकूण दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्यावर वकील थकले आणि पैसे पाठवणे बंद केले. पारुलने डाव उलटला – वकीलांच्या पत्नीला संबंधांची माहिती दिली आणि पुन्हा बलात्काराची धमकी दिली. हाताश झालेल्या वकीलांनीच गोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. ही घटना केवळ वैयक्तिक नसून, सोशल मीडियाच्या युगात प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीचा गैरवापर कसा होतो, याचे ज्वलंत उदाहरण आहे. वकीलांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत व्यक्तींना असा धक्का बसणे, हे समाजाच्या नैतिक पतनाचे लक्षण आहे.
पोलिस तपास सुरू असून, आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, हे प्रकरण डिजिटल ब्लॅकमेलच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत जागृती करणारे ठरेल. प्रतिष्ठा, पैसा आणि धमकी – या त्रिकोणीने वकीलांसारख्या व्यक्तींचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, हे आता सर्वांना कळले पाहिजे. कायद्याच्या सन्मानाने चालणाऱ्या व्यक्तीला कायद्याच्या नावाने फसवणे, हीच खरी गुन्हेगारी आहे.
