पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागात माळी कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिका या कामगारांना प्रत्येकी 30 हजार रुपये मासिक वेतन देते; परंतु कंत्राटदार त्यांना केवळ 12 हजार रुपये देतात. यामुळे उर्वरित रक्कम, म्हणजेच सुमारे 50 ते 55 लाख रुपये महिन्याला, कंत्राटदार आणि उद्यान विभागातील काही अधिकारी संगनमताने स्वतःच्या खिशात टाकत असल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचारामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे.
या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या; परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे आयुक्त स्वतः या आर्थिक भ्रष्टाचारात सामील असल्याची शंका कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. उद्यान विभागातील ही अनागोंदी आणि गैरव्यवहारामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्या कुटुंबीयांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
गेल्या सहा दिवसांपासून उद्यान विभागातील माळी कामगार आणि त्यांची नातेवाईक महापालिका मुख्यालयाच्याबाहेर आमरण उपोषण करत आहेत. तरी प्रशासनाकडून कारवाईऐवजी मौन बाळगले जात आहे. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून कामगारांना त्यांचा हक्काचा पगार मिळवून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाने नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, लवकरात लवकर कारवाई होणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महापालिकेत उद्यान माळी कामगारांचे ‘आर्थिक शोषण’
1–2 minutes
