पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांवर, विशेषतः शाळांच्या परिसरात, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आता स्थानिक वॉर्ड ऑफिसरच्या परवानगीने मार्ग मोकळा झाला आहे. नुकतेच एका अनोंदणीकृत संस्थेला वॉर्ड ऑफिसरकडून महापालिकेच्या शिक्षण विभाग उपयुक्तांच्या आदेशानुसार आणि शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांकडून मिळालेल्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’च्या आधारे शाळेच्या मैदानावर धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या परवानग्या मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या तरतुदींनुसार, वॉर्ड ऑफिसरकडे केवळ एक अर्ज करून सर्व धर्मीयांच्या संस्थांना, मग त्या नोंदणीकृत असोत वा नसोत, धार्मिक कार्यक्रम किंवा उपक्रम राबवण्यासाठी महापालिकेच्या मालमत्तांवर परवानगी मिळू शकणार आहे. यामुळे नवी मुंबईतील सर्व धर्मीयांना आपापले सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे महापालिका शाळांच्या मैदानांचा आणि इतर मालमत्तांचा वापर धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी अधिक सुलभ होईल. मात्र, याबाबत काही नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक असेल, ज्याची माहिती वॉर्ड ऑफिसरकडून मिळू शकते. या निर्णयाचे स्वागत करताना, यामुळे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक विविधता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या पावलामुळे स्थानिक समुदायांना त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. येत्या काळात या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व धर्मीयांनी वॉर्ड ऑफिसरशी संपर्क साधून आवश्यक परवानगी मिळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जर कोणत्याही अनोंदणीकृत किंवा नोंदणीकृत संस्थेला धार्मिक कार्यक्रम शाळेच्या मैदानावर घेण्यापासून वॉर्ड ऑफिसरने अथवा शिक्षण विभागाने मनाई केली असता, त्यांच्या विरोधात उपलब्ध कागदपत्रांच्या अनुसरून फौजदारी आणि न्यायालयीन खटला चालवण्यात येईल. ज्यासाठी, ‘अवर राईट्स फाऊंडेशन’ या मोफत कायदेशीर मदत करणाऱ्या संस्थेला संपर्क करावा.

महापालिका शाळांमध्ये अनोंदणीकृत संस्थांच्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी
1–2 minutes
