पालिका प्रशासन/सुदिप घोलप : हिंदू धार्मियांच्या विजयादशमीच्या उत्सवासोबतच, बौद्ध धर्मीय धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना बौद्ध अनुयायांना मोठा धक्का बसला. नवी मुंबई महानगरपालिकेने विश्वशांती दूध गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याच्या सभोवताल सजावट आणि विद्युत रोषनाई न केल्याने, अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध संघटनांनी महापालिकेकडे केलेल्या मागणीला ‘केराची टोपली’ दाखवत महापालिकेने अनभिज्ञता दाखवली. यामुळे गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अपमानित करण्याचा आरोप होत आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्मातील महत्त्वाचा दिवस आहे, ज्यामध्ये सारनाथ येथे भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन दिले होते. या दिवशी नेरूळमधील ‘ज्वेल्स ऑफ नवी मुंबई’ या ठिकाणी गौतम बुद्धांच्या पुतळा असणाऱ्या स्मारकाभोवती विशेष सजावट, फुलांचे हार आणि विद्युत रोषणाई करून धम्मचक्र प्रवर्तन उत्सव साजरा करण्यात यावा. अशी मागणी महापालिकेकडे 10-15 दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र, महापालिकेच्या संबंधित विभागाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. परिणामी, आज भर उन्हात साध्या टेबलावर विश्वशांतीदूत बुद्ध आणि महामानव डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा ठेवून केवळ पूजन करण्यात आले. सजावटीचा लवलेशही नव्हता, तर विद्युत रोषणाईचा प्रश्नच नव्हता. हा प्रकार बौद्ध धर्म आणि डॉ. आंबेडकरांच्या सन्मानाला धक्का देणारा असल्याचे अनुयायांकडून सांगितले जाते.
महानगरपालिकेच्या अशा वागणुकीमुळे, परिसरातील शेकडो बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “महापालिकेची ही निष्क्रियता धार्मिक भेदभाव दाखवणारी आहे. आम्ही गौतम बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे शांत राहू, पण हा अपमान सोडून देणार नाही,” असे काहींनी मत मांडले. तर, “शहरातील बहुसंख्य नागरिकांच्या भावनांचा आदर करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. ही दुर्लक्षितता पुढे जात असल्यास आंदोलन करावे लागेल,” असेही काहींनी मत व्यक्त केले.
तर, एकीकडे महानगरपालिका विविध इव्हेंटवर लाखो रुपये खर्च करत असताना, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याभोवती परिसरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली असती, तात्पुरता सभामंडप बांधला असता. तर असे किती खर्च झाले असते? असे उपहासात्मक प्रश्न आंबेडकर अनुयायांकडून विचारले जात आहेत. महानगरपालिकेने अशाप्रकारे विश्व शांतिदूत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या भावनांच्या केलेल्या अनादारामुळे, महापालिका आयुक्तांवर ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल का करण्यात येवू नये. अशी चर्चाही सामाजिक वर्तुळात सुरु आहे.


