1–2 minutes

पालिका प्रशासन : सजग नागरिक मंचचे सुधीर दाणी, अरुण कागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (24 सप्टेंबर) सकाळी 9:45 वाजता बेलापूर येथील सिडको कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रवेश वेळेच्या पालनाबाबत आणि ओळखपत्र न लावण्याच्या मुद्द्यावर जाब विचारण्यासाठी आंदोलन केले. मात्र, सिडको व्यवस्थापनाने याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर, सीबीडी पोलिसांनी सुधीर दाणी, अरुण कागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

सजग नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी सिडको कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शासकीय आदेशानुसार प्रथमदर्शनी भागावर ओळखपत्र का लावले नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याला प्रत्युत्तर देताना सिडको कर्मचारी महेश सुर्वे यांच्या तक्रारीनुसार सिडको व्यवस्थापनाने आंदोलकांवर कारवाई केली. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासकीय आदेशांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांवरच फौजदारी गुन्हे दाखल होत असल्याने महाराष्ट्रात “मोगलाई” सुरू आहे का, असा प्रश्न जनता विचारत आहे. या प्रकरणी सजग नागरिक मंचने सिडकोच्या कारवाईला अनाठायी ठरवत पुढील कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे. 


Design a site like this with WordPress.com
Get started