पालिका प्रशासन: नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा अभियंता दिवस (इंजिनिअरिंग डे) हा महत्त्वाचा वार्षिक दिवस गुपचूप आणि गुप्तपणे साजरा केला. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे वृत्तांतन करण्यासाठी पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले नाही, ही बाब प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. अभियंता विभागाच्या कार्यप्रणालीवर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही ‘गुप्तता’ असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असल्याने, आयुक्त तथा प्रशासकांच्या हुकूमशाही पद्धतीवर नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अभियंता विभागाच्या अनेक निर्णयांवर – जसे की पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांवर, करवसुलीतील गोंधळावर आणि अभियांत्रिक त्रुटींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीवर – अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून सतत आक्षेप घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला असता तर या मुद्द्यांवर थेट प्रश्न विचारले गेली असती, ही भीती आयुक्तांना लागून असावी, अशी चर्चा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांकडून रंगवली जात आहे. “पत्रकारांना निमंत्रित केले तर अभियंता विभागाच्या कमकुवत बाजू उघड होऊ शकतात, म्हणूनच हा कार्यक्रम पूर्णपणे बंदिस्त ठेवण्यात आला,” असा विश्वास व्यक्त करणारे अनेक अधिकारी आहेत.
महानगरपालिकेच्या इतिहासात हा अभियंता दिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमातून पत्रकारांना पूर्णपणे वगळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आजतगायत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि माध्यमांच्या उपस्थितीत साजरा होत असे, ज्यात अभियांत्रिक यशोगाथा आणि भविष्यकालीन योजना मांडल्या जायच्या. यंदा मात्र, हा कार्यक्रम केवळ अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित ठेवण्यात आला, ज्यामुळे नागरिकांमध्ये ‘काहीतरी लपवले जात आहे का?’ असा संशय निर्माण झाला आहे. एका ज्येष्ठ अभियंत्याने नाव न सांगितल्यास सांगितले, “हा दिवस अभियंत्यांचा सन्मान करण्यासाठी असतो, पण यंदा तो साजरा करण्याऐवजी लपवला गेला. यामुळे विभागातील असंतोष वाढेलच.”
या घटनेमुळे आयुक्त तथा प्रशासकांच्या प्रशासकीय कारभारावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. “महापालिकेची यंत्रणा हुकूमशाही पद्धतीने चालवली जात आहे का?” असा सवाल आता सर्वत्र उपस्थित होऊ लागला आहे. नवी मुंबईतील करदाते नागरिकांच्या पैशाने चालणाऱ्या या महानगरपालिकेत कार्यक्रम राबवणे आणि त्याची प्रसिद्धी करण्याऐवजी गुप्तता बाळगणे, हे ‘लपवालपवीचे कारस्थान’ असल्याची टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “करवसुली करून घेतात, पण जबाबदारी टाळतात. अभियंता विभागाच्या अपयशावर प्रश्न विचारू द्यायचे नाहीत का? ही पारदर्शकतेची कमतरता आहे.”
या घटनेने नवी मुंबईतील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढवली असून, महानगरपालिकेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वाढत आहे. अन्यथा, हा मुद्दा आणखी तापू शकतो.

महानगरपालिकेचा अभियंता दिवस ‘गुपचूप साजरा’
1–2 minutes
