पालिका प्रशासन/सुदिप घोलप : सिडको कार्यक्षेत्रातील माजी बृहन्मुंबई महानगरपालिका परिवहन (BMTC) कर्मचारी, ज्यांची बससेवा १९८४ मध्ये बंद झाल्याने उपजीविकेचे साधन हिरावले गेले होते, त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासाठी गेल्या ४२ वर्षांपासून कर्मचारी आणि विविध संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. या विषयावर आमदार विक्रांत पाटील यांनी अथक प्रयत्न करून सिडको प्रशासन तसेच संबंधित विभागांशी सातत्यपूर्ण समन्वय साधला. विशेष बैठका आयोजित करून चर्चा घडवून आणली आणि आवश्यक प्रस्ताव नगरविकास खात्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यास यश मिळवले.
आमदार पाटील यांनी अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे अखेर ६३१ माजी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मोबदला देण्याच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांना, ज्यांना यापूर्वी पीएफ आणि ग्रॅच्युइटी प्राप्त झाली आहे, त्यांना सिडकोच्या माध्यमातून १० लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय, उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक मोबदला त्वरित मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. आमदार विक्रांत पाटील यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे माजी BMTC कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

