पालिका प्रशासन: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या वॉर्ड आरक्षण प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. वॉर्ड रचनेत हेराफेरी करण्यासाठी माजी नगरसेवक आणि काही राजकीय नेत्यांनी लाखोंचा चढावा दिल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: मागील निवडणुकीत अनुसूचित जाती (SC) साठी आरक्षित असलेले वॉर्ड पुन्हा यंदाच्या निवडणुकीतही आरक्षित ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रिया हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणात ‘राजू’ नावाच्या व्यक्तीने पुढाकार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. वॉर्ड आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि गैरप्रकाराच्या या आरोपांमुळे महापालिकेचा निवडणूक विभाग शंकेच्या गर्तेत सापडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सामान्य नागरिकांनी या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने, वॉर्ड आरक्षण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडावी, यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे. या गैरप्रकारांमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

