पालिका प्रशासन/नवी मुंबई : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर आणि एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट परिसरात हजारो आंदोलक थांबले आहेत. त्यांच्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 29 ऑगस्टपासून अत्यावश्यक सुविधा पुरवल्या आहेत. मात्र, या सुविधांचा खर्च कोण भरणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेने सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 3 लाख लिटर क्षमतेचे 10 पाण्याचे टँकर आणि 5 अतिरिक्त टँकर उपलब्ध केले आहेत. तसेच, 150 नळांची व्यवस्था आणि 250 शौचालये पुरवली आहेत. शौचालय स्वच्छतेसाठी 30 कर्मचारी आणि 5 सक्शन मशीन तैनात आहेत. कांदा-बटाटा मार्केट येथे 40,000 लिटर क्षमतेचे 4 टँकर आणि 5 अतिरिक्त टँकर पुरवले गेले. स्वच्छतेसाठी 35 कर्मचारी सिडको येथे आणि 10 कर्मचारी कांदा-बटाटा मार्केट येथे 3 शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. कचरा वाहतुकीसाठी 8 वाहने तैनात आहेत. वैद्यकीय सेवेसाठी सिडको येथे 2 रुग्णवाहिका, वाशी टोल नाका आणि कांदा-बटाटा मार्केट येथे प्रत्येकी 1 रुग्णवाहिका, तसेच औषधे आणि डॉक्टर उपलब्ध आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 20 बेड राखीव ठेवले आहेत.
या सुविधांमुळे आंदोलकांना दिलासा मिळाला असला, तरी खर्चाची जबाबदारी कोणाची, याबाबत स्पष्टता नाही. शहाराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेचे हे पाऊल महत्त्वाचे असले, तरी आर्थिक बोजा चिंतेचा विषय आहे. यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पोलिस भरती किंवा इतर आंदोलने होतात त्यावेळेस अशा सुविधा महापालिका मोफत पणे कधीच पुरवत नाही. परंतु, नागरिकांमध्ये आता सर्व आंदोलकांसाठी मोफत (?)सुविधा देण्याची चर्चा आहे.

