1–2 minutes

पालिका प्रशासन/रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आज सकाळी ट्रेन क्रमांक 01167 मधून चालत्या गाडीतून उतरताना पडलेल्या प्रवाशाला आरपीएसएफच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून जीवदान दिले. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक होत आहे.

आज सकाळी 6:41 वाजण्याच्या सुमारास ट्रेन क्रमांक 01167 रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर येत होती. गाडी थांबण्यापूर्वीच एक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात पडला आणि फलाट व गाडी यामधील पोकळीत अडकण्याचा धोका निर्माण झाला. यावेळी गणपती बंदोबस्तासाठी फलाट क्रमांक 1 वर तैनात असलेले आरपीएसएफचे आरक्षक रणजीत सिंह आणि महेंद्र पाल यांनी तातडीने सतर्कता दाखवली. त्यांनी धावत जाऊन पडलेल्या प्रवाशाला पकडून फलाटावर खेचले आणि त्याला गाडीखाली जाण्यापासून वाचवले.

या घटनेत प्रवाशाच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर जखम झाली असून चेहऱ्यावर खरचटले आहे. जखमी प्रवाशाची ओळख दानिश रफीक हवलदार (वय 34, रा. घोलपा, रत्नागिरी, मोबाइल क्रमांक: 9561724911) अशी आहे. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या मूसा (मोबाइल क्रमांक: 8691964995) यांनी ही माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. त्यानंतर प्रवाशाला त्याच्या सहप्रवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची पडताळणी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजद्वारे करण्यात आली. यातून आरपीएसएफचे आरक्षक रणजीत सिंह आणि महेंद्र पाल यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे अनमोल जीवन वाचल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

“ऑपरेशन जीवन-रक्षा” अंतर्गत केलेल्या या सराहनीय कार्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी वर्गातून आरपीएसएफच्या या जवानांचे अभिनंदन केले जात आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started