1–2 minutes

पालिका प्रशासन: अखंड महाराष्ट्रातून ‘एक मराठा, एक गाडी’ या संकल्पनेतून, मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केल्यानंतरही जरांगे पाटील यांनी मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. “सरकारने कितीही आडकाठी आणली तरी आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

उच्च न्यायालयाने मंगळवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना जरांगे पाटील यांना आझाद मैदानात अनिश्चित काळासाठी आंदोलन करण्यास मनाई केली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, “सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी कब्जा करता येत नाही. आंदोलन निश्चित ठिकाणी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने केले पाहिजे.” मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. याचिकाकर्त्या एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली.

न्यायालयाने यावेळी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत पोलिस बंदोबस्त व्यग्र असल्याने आंदोलनास परवानगी देणे कठीण असल्याचे सांगितले. तसेच, शांततापूर्ण आंदोलनासाठी सरकार खारघर येथे पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ शकते, असेही न्यायालयाने सुचवले. जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याची मुभा असून, त्यानंतर सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, “न्यायदेवतेने नेमके काय सांगितले आहे, याचा आदेश मी अद्याप वाचलेला नाही. आमचे वकील कोर्टात जातील आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.” त्यांनी पुढे सांगितले की, मराठा समाजाच्या हक्कांसाठी ते शांततापूर्ण मार्गाने लढा देत राहतील आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. आता जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक पुढील कायदेशीर आणि आंदोलनात्मक पावले कशी उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेला तोंड फोडले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started