पालिका प्रशासन: नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयापासून उरण फाटा (सायन-पनवेल) दरम्यानच्या आम्रमार्ग रस्त्यावरील खड्डे आणि अयोग्य स्पीड ब्रेकर्समुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वकील ऍड. सुदिप दिलीप घोलप यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर विभागातील उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना कायदेशीर नोटीस पाठवून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
ऍड. घोलप यांनी आपल्या क्लायंट (सुरक्षितेच्या कारणास्तव नाव गुपित ठेवण्यात आले आहे) आणि इतर वाहन चालकांच्या वतीने ही नोटीस पाठवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सदर रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्स अनियमित आणि अयोग्य उंचीचे असून, रस्त्यावर खड्डे आणि असमतोल पृष्ठभागामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, प्रवाशांच्या जीवितासही धोका आहे. ही परिस्थिती भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा भंग करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांमध्ये सुरक्षित रस्ते हे जीवनाच्या अधिकाराचा भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ६३ अंतर्गत रस्त्यांची देखभाल आणि सुधारणा करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, आम्रमार्ग रस्त्याच्या दुर्दशेमुळे ही जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे ऍड. घोलप यांनी नमूद केले.
याशिवाय, इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्पीड ब्रेकर्सचे डिझाइन आणि स्थापना विशिष्ट मानकांनुसार असावी. यात स्पीड ब्रेकरची उंची, रुंदी आणि व्यास यांसारख्या तांत्रिक बाबींचा समावेश आहे. परंतु, सदर रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्स ही मानके पूर्ण करीत नसल्याने ते असुरक्षित असल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
ऍड. घोलप यांनी महानगरपालिकेला पुढील २४ तासांत रस्त्याची दुरुस्ती, खड्डे भरणे आणि स्पीड ब्रेकर्स IRC मानकांनुसार दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास ते न्यायालयात खटला दाखल करून नुकसान भरपाई आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

