पालिका प्रशासन/सुदिप घोलप : मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांसाठी कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या बुधवार, २० ऑगस्ट रोजी मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने आणि उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिठी नदीची पाण्याची पातळी देखील वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (LPA) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मुंबई महानगरपालिका आणि ठाणे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सखल भागात सावधगिरी बाळगण्याचे आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून, पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पावले उचलली आहेत. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कामही सुरू आहे.
सुट्टीबाबत अधिकृत घोषणा लवकरच स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित आहे. नागरिकांना हवामान खात्याच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

