पालिका प्रशासन : नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगावरील दबाव आणि मतदार यादीतील घोटाळ्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत मशाल मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चाद्वारे काँग्रेस पक्षाने आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील मोठ्या प्रमाणात घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणूक आयोगावर दबाव टाकून मत चोरीद्वारे गैरमार्गाने सत्ता मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाने देशभरात आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालय परिसरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हास्तरीय ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी तसेच शमी बच्चर, ऐश्वर्या भद्रे, कोपरखैरणे ब्लॉक अध्यक्ष सुनील पारकर, ब्लॉक उपाध्यक्ष अभिजित काकडे, मनोज उपाध्याय यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनी आणि महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.
पूनम पाटील यांनी यावेळी सांगितले की, “निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मतदार यादीतील घोटाळे लोकशाहीला कमकुवत करत आहेत. या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाचा लढा अधिक तीव्र होईल.”
या मशाल मोर्चाद्वारे काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात आपला संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत काँग्रेस पक्षाच्या या लढ्याला बळ दिले.

