पालिका प्रशासन/सुदिप घोलप : बेलापूर विधानसभेतून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे वाशी विभागातील प्रमुख नेते विक्रम शिंदे, अर्थात राजू शिंदे, यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. नुकतेच विक्रम शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यामुळे राजू शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विक्रम शिंदे हे वाशी विभागात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदाताई म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः, मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील वाशीतील इच्छुक पॅनलमधून त्यांना संधी मिळणे कठीण असल्याने, विक्रम शिंदे यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
विक्रम शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. त्यांनी वाशी परिसरात पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, ऐन गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मंदाताई म्हात्रे यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून अपेक्षित संधी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने, ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात विक्रम शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यासमवेत प्राप्त फोटोत एकत्र दिसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखत आहे. या कार्यक्रमात विक्रम शिंदे यांच्या उपस्थितीने त्यांच्या पक्षांतराच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत, विक्रम शिंदे यांच्यासारख्या स्थानिक पातळीवर प्रभाव असणाऱ्या नेत्याचा पक्षात प्रवेश हा शरद पवार गटासाठी फायदेशीर ठरू शकतो. याउलट, भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीसाठी हा धक्का ठरू शकतो, कारण विक्रम शिंदे यांचा वाशी परिसरात मोठा जनसंपर्क आणि प्रभाव आहे.
विक्रम शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चांचे एक कारण म्हणजे भाजपमधील अंतर्गत गटबाजी. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये त्यांना अपेक्षित स्थान मिळाले नसल्याने, त्यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा विचार केला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

