पालिका प्रशासन : राजस्थानच्या झालावाडा येथील शासकीय शाळेचे छप्पर पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), नवी मुंबईचे जिल्हा सचिव मंदार दिलीप घोलप यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त (शिक्षण विभाग) यांना निवेदन सादर करून सर्व शासकीय शाळांच्या इमारतींचे तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
घोलप यांनी निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे जीवित आणि सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तातडीने करावे. तसेच, जर असे ऑडिट आधीच झाले असेल, तर त्याचा सविस्तर अहवाल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक करावा, जेणेकरून पालक आणि नागरिकांना शाळांच्या सुरक्षिततेबाबत पारदर्शक माहिती मिळेल.
मंदार घोलप यांच्या मुख्य मागण्या:
1. तातडीने स्ट्रक्चर ऑडिट : सर्व शासकीय शाळांच्या इमारतींची सुरक्षितता तपासण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत स्ट्रक्चर ऑडिट करावे.
2. अहवालाची पारदर्शकता : ऑडिट अहवाल सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करावा.
3. दुरुस्ती आणि देखभाल : ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून इमारती सुरक्षित कराव्यात.
4. नियमित देखरेख : भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी दरवर्षी स्ट्रक्चर ऑडिटची व्यवस्था करावी.
घोलप यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. तसेच, या निवेदनाबाबत लवकरात लवकर लेखी उत्तर द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या मागणीमुळे नवी मुंबईतील पालक आणि नागरिकांमध्ये शालेय इमारतींच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली आहे. महानगरपालिका या विषयावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

