पालिका प्रसासन : नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा गाव सध्या विविध समस्यांनी वेढले आहे. उघडी गटारे, तुटलेली झाकणे, अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्या गटारांमुळे वृद्ध, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. याशिवाय, धोकादायक विद्युत उपकरणे, नाम फलकांची दुरवस्था आणि गतिरोधकांचा अभाव यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गावाच्या मध्यवस्तीत उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे मच्छर व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विद्युत उपकरणांची दुरवस्था आणि गतिरोधक नसल्याने दुर्घटनांचा धोका वाढला आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावाचा विकास स्मार्ट व्हावा, अशी अपेक्षा असताना मूलभूत सुविधांचा अभाव ग्रामस्थांना खटकत आहे. यासंदर्भात मंगलमूर्ती मित्र मंडळ, छाया कला सर्कल, मा. नगरसेविका भारतीताई कोळी आणि मनसेचे भूषण कोळी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेला वारंवार निवेदने आणि पत्रे देऊन समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

