पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातील ढिसाळपणा, आश्वासनांची पूर्तता न होणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे सिवूड्सचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या दोन दिवसांत सिवूड्समधील रहिवाशांसह बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत डिला आहे.
विशाल डोळस यांनी महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत सिवूड्समधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ज्यांमध्ये, सिवूड्समधील पाळणाघर 2021 पासून तयार असूनही अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे स्थानिक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.; सिवूड्समधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वाहतूक विभाग आणि वॉर्ड ऑफिसकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. यामुळे रहिवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.; सेक्टर 50 ते डीपीएस शाळेपर्यंत पादचारी पूल उभारण्याचे आयुक्तांनी एक वर्षापूर्वी आश्वासन दिले होते. मात्र, यासंदर्भातील फाइल्सवर अद्याप सह्या झालेल्या नाहीत. परिणामी, नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. येथे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल डोळस यांनी उपस्थित केला.; सेक्टर 46 ए येथील बांधकामादरम्यान झालेल्या ब्लास्टमुळे आजूबाजूच्या घरांना आणि सोसायट्यांच्या इमारतींना तडे गेले आहेत. याबाबत महानगरपालिकेने मध्यस्थी करून नुकसान भरपाईसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आहे.; सिवूड्स येथे स्पोर्ट्स सेंटर उभारण्याचे प्रशासनाने एक वर्षापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.; सिवूड्समध्ये नवीन गृहप्रकल्पांमुळे सुमारे 5,000 लोकसंख्येची वाढ होणार आहे. मात्र, यानुसार पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इत्यादी नागरी प्रश्न समस्या व मागण्यांच्या पूर्ततेचा समावेश आहे.
विशाल डोळस यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले. “वर नमूद सर्व मुद्द्यांबाबत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि विकासाला प्राधान्य देण्याऐवजी प्रशासन ढिम्म धोरण अवलंबत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे, नागरिकांच्या हक्कांसाठी आणि सिवूड्समधील विकासकामांना गती मिळावी यासाठी विशाल डोळस यांनी सिवूड्समधील रहिवाशांसह बेलापूर येथील महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. “जोपर्यंत प्रशासन या मागण्यांवर ठोस कार्यवाही करत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विशाल डोळस यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन महानगरपालिकेच्या कारभाराला जाग आणण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा स्थानिक रहिवाशांना आहे. तर, विशाल डोळस यांनी पुकारलेल्या जनआंदोलनात रहिवाशांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन बेधडक विशाल डोळस प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

