पालिका प्रशासन : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत, अगदी मध्यरात्रीपर्यंत रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथवर अंडा भुर्जी, चायनीज पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांची बेकायदेशीर विक्री जोरात सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बेकायदेशीर व्यवसायाला पोलिसांकडूनच छुपा पाठिंबा मिळत असून, प्रति महिना किमान १५ हजार रुपये हप्ता देऊन हे विक्रेते रात्रभर निर्धास्तपणे आपला धंदा चालवत आहेत. यामुळे कायदेशीर दुकानदार आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर आणि फुटपाथवर ज्वलनशील एलपीजी गॅसचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवले आणि विकले जात आहेत. कायद्याने अशा प्रकारच्या व्यवसायाला बंदी असतानाही, सुमारे १५ हून अधिक अंडा भुर्जी आणि चायनीज पदार्थांच्या गाड्या रात्रभर बिनदिक्कतपणे कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, हप्त्याच्या बदल्यात या बेकायदेशीर विक्रेत्यांवर कोणतीही पोलिसी कारवाई होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, लाखो रुपये भाडे, शासकीय कर आणि महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरून कायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुकाने बंद करण्याचे आदेश पोलिसांकडून दिले जातात. यामुळे कायदेशीर दुकानदारांवर अन्याय होत असून, त्यांचा व्यवसाय डबघाईला येत आहे. बेकायदेशीर विक्रेत्यांना मोकळीक देणाऱ्या पोलिसांच्या या दुहेरी भूमिकेमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांनी वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच रात्रपाळीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “जे कायदेशीर दुकानदार कर भरतात, त्यांना बंद पाडलं जातं, आणि बेकायदेशीर गाड्यांना मोकळीक दिली जाते. हे अन्यायकारक आहे. पोलिसांनी निष्पक्षपणे कारवाई करावी,” असे एका स्थानिक दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
तर एक चायनीज आणि अंडा भुर्जीची विक्रीची गाडी गावदेवी पोलीस चौकीच्या समोरच रात्रभर सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे.
तर, या सर्व एकंदरीत संदर्भात वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता व त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी “फोनवर चर्चा करण्यास टाळले आणि आमच्या प्रतिनिधीला पोलीस स्टेशनला या समोर बोलूयात” असे सांगितले. याअर्थ पोलिसांनाही या बेकायदेशीर गाड्यांकडून आर्थिक उन्नती पाहिजेच, हे आता सिद्ध झाले आहे.

